गुलमोहर – Gulmohar
आमच्या मलकापुरातल्या नरसोबाच्या देवळासमोर, तेंव्हा मोठं पटांगण होते तेव्हाची ही गोष्ट आहे. डावीकडे मागे सरकारी दवाखाना आणि कुटुंब नियोजन केंद्राची इमारत. याला आम्ही पोरं हॉस्पिटल असं म्हणत असू. हॉस्पिटलवर जाण्यासाठी काँक्रीट स्लॅबमधून काढलेला ओबड धोबड जिना आणि वर कठडे नसलेली नुसतीच रिकामी स्लॅब होती. या स्लॅबवर आम्हा पोरांचे खूप उद्योग चालत. तेंव्हा नरसोबाच्या देवळाला लागून नाटकासाठी रंगमंच पण बनला नव्हता. देवळासमोर मुख्य रस्त्याच्या लायनीत एका बाजूला, राजवाड्यात जायची मोठ्ठी कमान आणि तिच्यावर नगारखाना होता. नगारखान्याची वास्तु तेव्हा सुस्थितीत होती. नगारखान्याच्या या भिंतीना लागून, एका बाजूला सरकारी डॉक्टरचे निवासस्थान आणि दुसरीकडे गण्या भोसले राहायचा..
हे झालं या पटांगणाच आणि आजूबाजूच्या भागाच ढोबळ वर्णन. यात आणखीन एक मोठ्ठी आणि न लपणारी गोष्ट होती, ती म्हणजे गुलमोहराच भलं मोठं झाड. त्याचा आकार सुद्धा डेरेदार, लक्षात राहणारा आणि नगारखान्याच्या उंचीच्यावर आकाशात पसरलेला होता.. एव्हढ्या मोठ्या रिकाम्या परिसरात हे झाड नसतं, तर सगळाच परिसर रुक्ष दिसला असता. या गुलमोहरामुळे मात्र आख्या एरियाला वेगळीच शान मिळाली होती. विशेषतः उन्हाच्या दिवसात लालेलाल होऊन जाणाऱ्या गुलमोहरामुळं मागचा नगारखाना, माझं वैभव गेलं नाही अजून, असं सांगत उभा असायचा.
बरीच वर्षे गुलमोहराच्या आजूबाजूला रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आणलेली डांबराची पिंपे पडलेली होती. याबरोबरच एक मोठा अवजड रोडरोलर पण पडला होता. वजना प्रमाणे कलणाऱ्या त्याच्या दोन्ही बाजूंवर उभे राहून, सर्व कार्टी वजन वजन खेळत असत. या विस्तीर्ण पटांगणात आम्ही विटी-दांडू, गोट्या, क्रिकेट खेळत असू. पटांगणात क्रिकेट खेळताना, दोन टीम होणार नसतील तर नंबर पाडून खेळताना, ते नंबर याच रोडरोलरच्या गोल भागावर आखले जात.. अवलादी पोरांच्या खेळण्यामुळे आणि त्यावर लोळण्यामुळे रोडरोलरचे लोखंडी आवरण स्वच्छ, न गंजलेले आणि स्वच्छ होते. याच्या वरचा भागावर आडवे पडून वर बघत राहिले की मस्त थंडगार वाटायचे. वरच्या निळ्या आकाशात घुसणारी गुलमोहरांची पोपटी हिरवी पाने आणि लाल फुलं दिसत.
गुलमोहराच्या झाडाला दगडी कट्टा केलेला होता. गुलमोहर उन्हाळ्यात फुलला, की त्याची, लाल-गुलाबीसर छटेची लाललाल फुलं एकदम मस्स्त दिसायची. या लाल फुलात पांढरे टिपके असलेला एक कोंबडा असायचा. हा कोंबडा खाण्याची सर्व पोरांची चढाओढ असे. किंचित आंबटसरगोड चवीचे कोंबडे आपण खाल्ले नाही, तर सगळ्यांच्यात मागे राहू या भीतीने पोरं वचावचा कोंबडे तोंडात कोंबत. कदाचित त्यातून मोठ्यांच्या पान खाण्याचा आविर्भाव पण आणायचा असे.
गावाची शान असलेली टेकडी म्हणजे महादेवखडीवरुन लाल फुलांनीं भरलेला, हा गुलमोहर एकदम डोळ्यात भरत असे. हे दृश्य बघितल्यावर मला कसला तरी अवर्णनीय आनंद व्हायचा. इतका की, हा आनंद छातीतून बाहेर पडून खडीवरुन वाहतोय असं वाटायचं. खडीवरून आपापले घर शोधणे आणि एकमेकांना दाखवणे, हा पण उद्योग सर्व पोरं करत. आपण खाडीवरच रमलो.. विषय गुलमोहराचा सुरु आहे तिकडं परत येतो.
गुलमोहोराला पोपटी हिरव्या रंगाची आणि मध्ये लालसर रेषा असलेली मऊसर बोन्डे येत. बोन्डे तोडून एकमेकांना फेकून मारुन लढाई खेळणे असे महान कार्य आम्ही निभावत असू. पोपटी बोन्ड सोललं की आत फोल्ड झालेल्या गुलाबी पाकळ्या असत. हे दृश्य अतिशय नाजूक आणि विलोभनीय दिसत असे. या सर्व पाकळ्या काढून टाकल्या, की आत लाल रंगाचे रेशमी डोकी असलेले दांडे असायचे. प्रत्येकजण आपापला दंड घेऊन दुसर्याशी लढाई करायचा. ज्याच्या दांड्याचे डोकं तुटलं, त्याचा सैनिक मेला. मग काही वेळा खेळणारे फक्त दोघे आणि सभोवताली उगाच आरडा ओरडा करणारी दहा टाळकी असं चित्र पण असायचं.
राजवाड्याच्या कट्ट्यावर गुलमोहराच्या सावलीत, तासन तास आडवे पडून राहायला फार मस्त वाटायचं. आडवं पडलं की सुरवातीला जरा खडे टोचायचे, त्याकडे दुर्लक्ष करायचं. पण मग असली मस्त गुंगी यायची, की तिथून कधीच उठूच नये असं वाटायचं. त्यावेळी माझ्या घरी इंद्रजाल कॉमिक्स यायचं. वेताळ, लोथार आणि मँड्रेकच्या गोष्टी. सुरवातीला वडीलांनी वाचून दाखवलेल्या नव्या कॉमिक्स मधल्या गोष्टी ऐकून, फॅंटसीच्या जगात वेताळाचा पांढरा शुभ्र घोडा- तुफान आणि वाघ्या कुत्र्याला घेऊन फिरायचं महान कार्य, इथेच या गुलमोहराच्या सावलीत केल्याचे आठवते.
बेचाळीस वर्षांनी शाळेच्या गेट टुगेदरला गेलो होतो. या पटांगणात आता यातलं काहीच दिसत नाही. नवीन झालेल्या नगरपालिकेच्या इमारतीने आमचे क्रिकेटचे आख्खे ग्राउंडच खाऊन टाकले. तिने गिळलेले ग्राउंड बघावे लागू नये म्हणून की काय कोण जाणे, गुलमोहर आधीच पडून गेला. मागचा सरकारी दवाखाना व हॉस्पिटलच्या स्लॅबवर जायची इच्छाच उरली नाही. गेट टुगेदरला गेलो, पण तिकडं न बघताच पटकन निघून आलो.