बहावा – Bahava
बहावा म्हटलं की मला कायम १९७८ साला मधली फिल्म इन्स्टिट्यूट आठवते. माझ्या जॉबचा पहिला दिवस. मेनगेटवर सिक्युरिटीत एंट्री करुन समोर पाहिलं, तर फुलू लागलेला पिवळा धम्मक बहावा होता. पहिल्या-वहिल्या जॉबचं सगळं टेन्शन एकदम गायब. गावाकडचा यार भेटावा, तसा बहावा मला तिथं भेटला. याचा पिवळा रंग कायम झळाळता सोनेरी पिवळा वाटतो. उन्हाचे चटके बसायला लागले की सर्वांच्या तोंडात, आत्ताच एव्हढं तर मे महिन्यात काय होणार? अशी ठरलेली वाक्य येऊ लागतात. इतरवेळी हा बहावा ओळखू येत नाही, कारण त्याची पाने इतर झाडांसारखी हिरवीच असतात. पण लोक सूर्याला शिव्याशाप देऊ लागले, की मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदलूनच जाते. बहाव्याला आधी एखादाच पिवळ्या फुलांचा घोस येतो, मग दुसरा-तिसरा आणि बघता बघता सगळे झाड सोनेरी पिवळ्या रंगाच्या गुच्छांनी भरून जात. मग बहाव्याची खरी गम्मत समजायला लागते.
बहाव्याला काळसर चॉकलेटी रंगाच्या शेंगा येतात. एकदम गुळगुळीत असलेल्या या शेंगात कवठासारखा मऊ औषधी गर आणि बिया असतात. किंचित गोडसर असलेल्या या शेंगा, अस्वलाला फार आवडतात. व्यंकटेश माडगूळकरांनी यावर फारच सुंदर लेख लिहिला होता. हावरटपणे बहाव्याच्या शेंगातील मऊ-गोड गर, खाऊन झाल्यावर अस्वलाची अवस्था कशी होते, याचं अप्रतिम वर्णन माडगूळकरांनी केलं होत. अजूनही कोणी पोटाला तडस लागेपर्यंत जेवलं, की आम्ही त्याला, _कारे अस्वल झालं का?_ असं विचारतो.
बारा-पंधरा वर्षांपूर्वी हा पिवळा धम्मक सोनेरी बहावा दारात लावायचा असं आम्ही ठरवलं होते. पण ते काही ना काही कारणांनी राहूनच जात होतं. भटकंती करत एकदा मी आणि नयना, सोलापूर रोडवर यवत जवळच भुलेश्वराचं मंदिर बघायला गेलो होतो. परत येताना एक नर्सरी दिसली. जरा झाडे बघू म्हणून आत घुसलो. सगळी नर्सरी पालथी घालून एक दोन झाडं पण घेतली. इकडं तिकडं फिरताना, छोट्याश्या पिशवीत एक-दोन पिवळट पडलेल्या पानांचे खुरटे रोप दिसले. त्याच्याकडे निरखून पाहतोय म्हटल्यावर, तिथल्या मावशींनी तो बहावा आहे असं सांगितलं.. बहावा म्हणल्यावर आम्ही पेटलोच. एकच राहिला आहे, घिऊन जा मस्त वाढेल.. या आश्वासनावर दोन हातात अगदी काळजीपूर्वक धरुन त्याला घरी घेऊन आलो. आमच्या कुत्र्यापासून सुरक्षित राहावा म्हणून तो फुलांच्या वाफ्यात ठेवून दिला.. म्हटलं आता पावसाळ्यात याला दारात लावून टाकू..
तो खरा कुंपणाच्या बाहेर लावायचा होता. पण आमच्या घराचं कम्पाउंडच झालेलं नव्हतं. त्याला जरा जास्त वेळ पण लागणार होता. म्हटलं बहावा आता आणला तर आहे, तो कुठे पळून चाललाय.. अगदी खुरट्या बहाव्याला पाणी वगैरे घातल्यानं त्याला खरंच चांगली फूट आली. पण ऑफिसच्या कामाच्या गडबडीत तो त्याच्या पिशवीसकट त्याच जागी राहिला. सहाएक महिन्यांनी तो लावायचा म्हणून पिशवी उचलायला गेलो, तर बहाव्याची मुळं पिशवी फाडून जमिनीत खोल गेली होती. लावण्यासाठी त्याची मुळं जितकी लांबवर कापता येतील तितकी कापून घेऊन, तो कुंपणाबाहेरच्या खड्यात लावला आणि पाणी देत राहिलो. पण काय झालं समजलंच नाही. त्याला घराबाहेर काढलं म्हणून की काय, तो तिथं रुजलाच नाही. त्याची ती जागा अजून तशीच रिकामीच राहिली आहे..