बेडेकर मिसळ – Bedekar Misal
अण्णा बेडेकर यांची ‘बेडेकर मिसळ’ हा पुण्याच्या आद्य खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग होता आणि आजही त्यांची तिसरी चौथी पिढी तो यशस्वी चालवते आहे. मी तिचा पहिला अनुभव १९७५ सालात, नारायण पेठ पोलीस चौकीच्या शेजारच्या छोट्याश्या जागेत घेतला. ही जागा म्हणजे, अणु-रेणू दाटीवाटीने कमीत कमी जागेत माववून घेत असतील, याची जाणीव करुन देणारी होती. बेडेकर टी स्टॉल असं अंधुक दिसणाऱ्या बोर्ड लावलेल्या चौकटीतून, मान खाली घालून आत जाणाऱ्या गर्दीला थांबवणारे बेडेकर उभे. बाहेर तर डायरेक्ट रस्ताच होता, त्यावर अस्वस्थपणे उभे राहून आपल्या नंबराची आणि आतला माणूस बाहेर कधी येतो, याची उत्कंठेने वाट पाहत थांबलेले बारा-पंधराजण .
आतून येणाऱ्या वासामुळे उद्दीपित अवस्थेत तिथे समोर थांबणे, म्हणजे आपल्याच बेकाबू-अस्वस्थ आत्म्याला-प्राणांना, कसेबसे थोपवून धरणे असायचे. खमंग, तोंडाला पाणी सोडणाऱ्या वासात, एकदा हा पाय मग दुसऱ्या वेळी तो, असं करून एकदाची तपश्चर्या पूर्ण झाली म्हणजे मग तुमचा नंबर येणार. विनम्रपणे वाकून आत गेले की मागच्या बाजूला, किचनसारखा भाग आणि उरलेल्या जागेत टेबलं आणि बसण्यासाठी बहुतेक बाक असावेत. तिथं बसायला खाली काहीतरी होते, पण ते कधी दिसले नाही. एकदा आत प्रवेश मिळाल्यावर असले फालतू विचारही मनात यायचे नाहीत. जिथे मिळेल तिथे अड्जस्ट होऊन बसावे लागायचे. त्यामुळे आपण स्थानापन्न झाल्यावर शेजारचा नाक पुसत, अत्यानंदाने तोबरे भरत असायचा. त्याच्या ब्रम्हानंदाकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून असूयेने बघत, नंतर पूर्णपणे काणाडोळा करुन, हाफचड्डीतला पोऱ्या आपली प्लेट कधी आपल्या समोर आदळतो, याच्याकडे सगळे लक्ष केंद्रित करावे लागायचे.
एकदा का टेबलवर मिसळीचा सुका वाडगा- दोन स्लाइस ब्रेड आला की मग सगळे प्राण, मागून येणाऱ्या पातळ भाजीकडे लागलेले असत. पातळ भाजीला _कट, तर्री_ वगैरे अमानवी शब्द वापरण्याची त्याकाळच्या पुण्यात नव्हती. _शांsम्पल.._ असा फुळकवणी उच्चार करणारे काहीजण काही लोकं होते. पण _पातळ भाजी_ हा खास बेडेकरी शब्द. स्टेनलेस स्टीलचा पातळ भाजीने ओसंडणारा मग, समोरच्या मिसळीवर आणि रिकाम्या वाटीत रिता होई. वाढणार्याचे हात समोरुन कधी बाजूला जातात आणि आपण या सर्व परमानंदाचा पहिला घास कधी घेतो असे होत असे. एकदा मिसळ समोर आल्यावर, पहिला घास तोंडात पोहोचे पर्यंत, खाणाऱ्याच्या चेहऱ्यावर जे स्वर्गीय भाव येतात, त्याला मलातरी अजून उपमा सुचलेली नाही. चवीमधलं सुख काय असतं, ते इथंच समजलं.