बालगंधर्वांची अखेर – Last Rites of Balgandharva
ही पोस्ट व्हाट्स ऍपवर बऱ्याच ग्रुपवरुन आली होती, ती या आधीही वाचलेली होती. मी काही काळ या ग्लॅमरच्या झोतामधे राहणाऱ्या व्यक्तींना जवळून बघितले आहे. म्हणून त्या संदर्भात काही लिहावे असे वाटले.
नाटक-सिनेमा-रंगभूमी ही अशी क्षेत्रं आहेत, जिथं एकदा तुम्ही शिरलात, की तिथं स्वतःची प्रसिद्धी सतत करत राहावी लागते. एखाद्या नाटकाचे शंभर प्रयोग व्हावेत असं वाटत असल्यास, त्या नाटकाबद्दल वर्तमानपत्रात, मीडियात काहींना काही छापून आणावं लागत. हल्ली आता वर्तमानपत्रं बातम्या-फोटो छापण्यासाठीसुद्धा पैसे घेतात किंवा नाटकाच्या जाहिराती करायला लावतात. त्या वर्तमानपत्रात द्याव्या लागतात. सतत जाहिराती कराव्या लागतात. साधी जाहिरात करून चालत नाही, कारण तीच तीच जाहिरात प्रेक्षकांना तुमच्या नाटकाचे तिकीट, पैसे खर्च करुन नाट्यगृहावर आणायला पुरेशी ठरत नाही. त्यात काही गिमिक्स मुद्दाम घालावी लागतात. नाटकाच्या तालमी, त्यातली गाणी यांचा काहीतरी इव्हेन्ट करावा लागतो. हल्ली टीव्ही चॅनल्सवर असे प्रमोशन्स करणारे कार्यक्रम असतात. त्यात हे सगळे दिसावे लागते. आता सिनेमा असेल तर नव्या हिरो आणि नवीनच हिरोईनचे कसे खास संबंध आणि केमिस्ट्री कशी तयार झाली आहे. ते अमुक ढमुक ठिकाणी एकत्र दिसले, त्याचे ग्लॅमर मॅगझिनला फोटो. मग काही काळाने कोणी कोणाला डिच्यू दिला. याचे व तिचे का फाटले या लेव्हल पर्यंत ही पब्लिसिटी जाते. अशा चमचमीत बातम्या तयार केल्या की अशा बातम्या आवडणारे, या हिरो-हिरोईन्सचे चाहते (फॅन्स) बनतात. फॅन्स वाढले की मग या हिरो-हिरोईन्सची किंमतही वाढते.
एकदा ग्लॅमरच्या जगात तुमचे _फॅन_ घुसले की मूळ हिरो-हिरोईन बाजूलाच राहतात आणि सगळा बाजार हे फॅन्सच हलवू लागतात. एकदा या मायाबाजारात, तुम्ही तुमची अशी पब्लिसिटी करायला लागलात, की तुमचं खासगी आयुष्य *पब्लिक प्रॉपर्टी* होत. मग त्यावर तुमचा हक्क कायमचा संपतो आणि तुमच्या हीरो इमेजचा _चिवडा_ करायला सगळ्याच सामान्य लोकांना आवडत. जो पर्यंत अशी पब्लिसिटी तुमचे मार्केट प्राईस वाढवत असते आणि तुमच्या हक्कांना अबाधित ठेवते, तोपर्यंत तुम्ही सुद्धा एकदम मजेत असता. कुठेही बाहेर पडलं की चारी बाजूला चाहते येतात, गराडा घालून सह्या घेतात. वाट्टेल ते पैसे घेऊन प्रोड्युसर आणि व्यापारी तुमच्या दारात लाईन लावून उभे असतात. मग खरी गोची इथून पुढे असते
अशा स्थितीत मग सवंग पब्लिसिटी साठी एखाद ग्लॅमर मॅगझिन तुमच्या आणि कोणाच्या तरी प्रेम संबंधावर एखाद आर्टिकल छापत. (या मॅगझिनच्या अश्या काहीतरी भानगडी छापल्या शिवाय, त्यांच्याही ग्लॉसी कॉपीज खपत नसल्यानं ते मजबूर असतात) ते वाचून ग्लॅमरच्या दुनियेतले _फॅन_ नावाचे लोक हलकल्लोळ करतात. त्याच्यावर सगळीकडून फुकट चर्चा आणि गोंधळ घातला जातो. मग अशावेळी हिरोची मार्केट प्राईस अजून वाढते, मग पुढचा सिनेमा याच गदारोळात प्रसिद्धी माध्यमातून सादर होतो. हिरो-हिरोईनची किंमत एव्हढी वाढली हे वाचून, आपल्यासारखे मूर्ख सामान्य लोक, आता या सिनेमाचं ऍडव्हान्स बुकिंग करूनच सिनेमा बघायचा असं ठरवून टाकतात.
बालगंधर्वांच्या काळात असं नव्हतं असं नाही. पण ते कमी प्रमाणात असे. जेंव्हा गंधर्व कंपनी फुल फॉर्मात होती, तेंव्हा तिच्या आख्ययिका पसरवल्या जात. ओरिजिनल कनौजी अत्तराचे फवारे, खरे खुरे महागडे शालू-दागिने आणि इतर वातावरणाची जाहिरात सामान्य लोकच करत. पुढं नाट्य क्षेत्राला सिनेमाची स्पर्धा आली आणि लोक तिकडे वळू लागले. गंधर्व कंपनीचे उत्पन्न घटले. मग ते दिसू नये म्हणून परवडत नसताना थाट आणि खर्च वाढला. यात चोरांनी हात धुऊन घेतले आणि गंधर्व कंपनीचे तीन तेरा वाजले. बालगंधर्व अक्षरशः रस्त्यावर आले. त्यावेळी त्यांच्या सोबत फक्त गोहरजान होत्या आणि त्या शेवटपर्यंत राहिल्या. पण आपल्याकडे असलेल्या हिंदू-मुसलमान वादामुळे, त्यांचा मृत्यू होताच हिंदू चाहत्यांनी पटकन धाव घेऊन, बालगंधर्वांचे अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने उरकून घेतले. नाहीतर त्यांचे दफन केले जाईल अशी भीती त्यांना वाट वाटली असावी. इथं मी सांगितलेला मुद्दा लागू होतो. बालगंधर्व मराठी माणसाची, महाराष्ट्राची प्रतिभा म्हणून गाजले. त्यांच्या खासगी आयुष्याशी लोकांना चाहत्यांना काही घेणे राहिले नाही. ते हिंदू आहेत, त्यांचे दफन होऊ देणार नाही. हाच मुद्दा फॅन्सनी उचलून धरला.
हे सगळं शेवटी मानसिकतेशी ही निगडित आहे. सामान्यांची मानसिकता, धर्म आणि जातीची मानसिकता. या जाहिरातींमधूनच आजच्या टी आर.पी. चा जन्म झाला आहे. ही एकूण मानसिकता कुठे जाते, त्यावर टीव्हीच्या मालिका चालत असतात. रटाळ एपिसोड, कोणीही कोणाचा सहज खून करतो, मूर्ख मठ्ठपणा सगळं समजून उमजून, आपणही शिव्या घालत ते बघतो आणि फुकट चर्चा करत बसतो. या निरर्थक बघण्यातून आपलं आयुष्य सुद्धा तसंच बेगडी जगायला शिकतो. ग्लॅमरच्या जगात अशा प्रेम कहाण्या पसरवाव्या लागतात. ती जर अन सक्सेसफुल असेल तर मग त्याला मजा काही औरच..