Select Page

चार गोष्टी गमतीच्या..

मनात रेंगाळलेला मारवा.. – Marwa..

माझा शास्त्रीय संगीता बरोबर फार संबंध आहे असं नाही, पण नदीच्या उथळ पाण्यात, आपण जितकं खेळतो तेव्हढा मात्र नक्की आहे. सवाई गंधर्वमधे गायन कधीतरी ऐकावं असं वाटायला लागल. मग वसंतराव देशपांडे अगदी जवळच रहातात असा शोध लागला. वसंतरावांचा गाण्याचा शोध सुरु होता ती मारव्याची गोष्ट समजली. मग नक्की वाटलं गाणं ऐकायला पाहिजे. लहानपणी वसंतराव लाहोरला मामाकडे गेले होते. तिथं एका पायऱ्या असलेल्या विहिरीत, काही फकीर राहत. एक नवा पैसा देऊन वसंतरावांना एक चीज लिहून घेता येत असे. वसंतरावांची वही बरीच भरली होती. त्यांना तो छंदच जडला होता. त्यांच्या मामाने वसंताचा छंद पाहिला आणि वसंताला विचारले, “तुला खरेच गाणं शिकायचं असेल तर मग ही वही फेकून दे आणि त्यांचा गंडा बांध..”. मामाने वसंताला एक ढब्बू पैसा दिला आणि त्याची ताटभर मिठाई आणि गांजा घेऊन फकीरा कडे जायला सांगितले. फकीराने वसंताला गंडा बांधला आणि  ‘सा’ लावायला शिकवायची सुरवात केली. काही महिने फक्त मारवा शिकवल्यावर, फकीर वसंताला म्हणाला, “तुला मारवा समजला, जा आता तुला संगीत येईल..” गझलवर ज्यांनी डॉक्टरेट केली ते डॉ. सुरेशचंद नाडकर्णी, त्याच्याच कडून खूप पुढच्या काळात ही वसंताच्या मारव्याची गोष्ट ऐकली होती.

माझ्या काकाच्या बोलण्यात अमीरखान साहेबांच्या मारव्याचा उल्लेख आला. त्याच्याकडे रेकॉर्ड्सचे कलेक्शन होते. आधी वसंतरावाचा मारव्याचा किस्सा माहिती असल्याने लगेच कान टवकारले, पण त्याची रेकॉर्ड कुठे उपलब्ध नाही, हे ऐकताच सगळं फुस्स झालं. ठराविक गाणं ऐकायला त्याकाळात, खूप कष्ट घ्यावे लागत. एक तर प्रत्यक्ष मैफलीत किंवा कोणाकडे रेकॉर्ड असेल आणि त्याची तुमच्यावर कृपा झाली तर..  एव्हढेच पर्याय असत. वसंतरावांचा एक मारवा नंतर कधीतरी कॅसेटवर ऐकायला मिळाला खरा, पण त्याची क्वालिटी फारच खराब होती आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या मारव्याची मी वाट पहात होतो. तसा तो वाटलाच नाही. पन्नालाल घोष यांचा बासरीवरचा मारवा एका छोट्या EP रेकॉर्डवर बऱ्याचवेळा पैसे खर्च करुन ऐकला होता.

अमीरखान साहेबांच्यावर दूरदर्शनने केलेली एक डॉक्युमेंटरी दिल्ली दूरदर्शनवर पहिली. त्यात त्यांचं गाणं कानावर पडलं आणि मग मनात रेंगाळणारा मारवा, अजूनच मनात बसला. रेकॉर्ड आहे, मग तो कधीतरी नक्की ऐकायला मिळेल अशी आशा पालवली. मग आला कॅसेट्सचा जमाना. कर्वेरोडवर अलुरकरांचं कॅसेट्स आणि रेकॉर्ड्सचं मोठ्ठं दुकान होत. तिथं येताजाता उगाच चक्कर मारायची सवय होती. ऐकण्यासाठी जवळ कसलाच प्लेयर नसला, तरी बाजारात नवीन काय आलं, हे माहिती हवं म्हणून उगाच फिरून यायचो. एकदा नेहमी सारखा तिथं गेलो आणि इकडे तिकडे बघताना, सहज नजर वर गेली. वरच्याच बाजूला चक्क अमीरखान साहेबांच्या मारव्याची LP रेकॉर्ड डिस्प्ले केलेली दिसली. रेकॉर्डच्या एका बाजूला मारवा आणि दुसऱ्या बाजूला दरबारी होता.

मग मनाने जी कोलांटी उडी मारली त्याला तोडच नाही. मनाचं तांडव शांत झाल्यावर, प्रश्न उभा होता या रेकॉर्डची किंमत किती? मग आधी स्वतःला समजावलं, आपल्याकडं आत्ता पैसे नसले, तरी आपण ती घेणार आहोत ना? मग माझाच मला धीर आला. किंमत समजली ३५ रुपये. ही रक्कम तेंव्हा खूप मोठी होती. लोकांचे पगार ७५ रु. पासून १००-१२५ रु. पर्यंत असायचे. लगेच पुढची हर्डल तयार होती. किती लौकर हे पैसे जमवावे लागतील? मनात हाच विचार – शॉर्टेज नंतर आलेली रेकॉर्ड कुणी घेण्याआधी, आपण घेतली पाहिजे. मग सायकलवर टांग टाकून परत होस्टेलच्या खोलीवर. तेंव्हा फ्रीलान्स कामं करायचो. पुढं नक्की काय काय केलं, ते इतकं आठवत नाही. पुढचे काही दिवस फक्त डोक्यात रेकॉर्डच होती. शेवटी एकदाचे रोख पस्तीस रु. जमले.

ती रेकॉर्ड विकत घेऊन हॅण्डलला अडकवून काळजीपूर्वक सायकल मारत, सहकारनगरला काकाच्या घरी गेलो आणि त्याला ती देऊन टाकली. आता केव्हाही मारवा ऐकायची सोय झाली. हा मारवा आलापी सकट पाठच झाला, इतक्यांदा ती रेकॉर्ड ऐकली. आता हे सगळे उद्योग करून काय मिळालं? असं कोणी विचारेल, तर आजही डोळे मिटून मनात मारवा आणला, तर आमीरखान साहेबांचा जुळवलेला तंबोरा आणि तो घुमारेदार आवाज मनात रुंजी घालू लागतो. आणि सगळ्या गोष्टी फक्त पैशांसाठी करायच्या असं कुठं आहे? कधीही दरवळणाऱ्या मारव्यानं, पैशांपेक्षा खूप कैक पटीत समाधान दिलय हे काय कमी आहे?