मॅनेजर – Manager
काही लोकं आपल्या आयुष्यात डोकावून आपलं सोनं करून निघून जातात. पण हे पैशांच्याच बाबतीत नसल्यामुळे आपल्याला त्याचा पत्ताच नसतो. पुढं या एफ.डी.चा शोध कधीतरी लागतो, तेंव्हा असं सहज डोकावून गेलेला, हे जगच सोडून गेलेला असतो. कॉलेजचे आयुष्य असाच माणसे भेटण्याच्या सुगीचा काळ. कॉलेजचं पहिलं वर्ष, आपण धड मोठे ही नसतो, किंवा लहान ही राहिलेले नसतो. मधलीच अवस्था. नक्की कुठे, सगळाच घोळ असतो. आजूबाजूला इतकं काही घडत असतं, की कुठे बघावं? काय करावं काहीच समजत नसतं. तरुणाईची रग वेगळेच संकेत देत असते, त्यात मखमली घोळ अजूनच वाढायला लागतात. मग हे सगळं सहन न झाल्यानं आपण म्हणतो, मरु देत सगळं आणि स्वतःला प्रवाहात झोकून देतो. बेभान वहात जाण्यातच मजा यायला लागते. आत्ता पर्यंत कधीच न जाणवलेली पैश्यांची गरज, आता मात्र चणचण निर्माण करते. घरुन पैसे पाठवा.. असं सांगायला हात, जीभ अडकते. मला वाटतं हा आपल्या सगळ्यांचाच प्राथमिक अनुभव.
घरापासून पहिल्यांदाच दूर राहणार्यांना सगळेच प्रॉब्लेम असतात. राहण्याच्या खोलीचा प्रश्न सुटल्यावर, दुसरा भेडसावणारा प्रॉब्लेम म्हणजे मेस किंवा उदरभरणाचा. मला या पॉइंटवर मॅनेजर भेटले. कॉलेजच्या बॉईज होस्टेलची मेस चालवणारे हे मॅनेजर. स्वच्छ धुतलेला पांढरा लेंगा, लांब बाह्यांचा हाताची बटणे लावलेला, खाली गोल कट असणारा टिपिकल लांब पांढरा शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी आणि डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा. पहिल्यांदा त्यांना पाहिलं, तेंव्हा बहुतेक घरातून पूजा करून आले असावेत; कारण चष्म्याच्या वरच्या कडेपासून केसात गेलेला कुंकवाचा नाम होता. असे नाम लावणाऱ्या लोकांबद्दल का कोण जाणे मला भीतीच वाटते. पण यांच्या बाबतीत वाटलेली ही भीती नंतर खोटी ठरली. त्यांच्या या चष्म्याची सुद्धा गंमत होती, महत्वाचं बोलताना तो डोळ्यांवरून काढून, हातात घेऊन, त्याच हाताने आपले म्हणणे, चष्मा स्वरोच्चारा प्रमाणे वर-खाली करत आणि त्याला सपोर्ट म्हणून दुसरा हात कंबरेवर ठेऊन, त्यांचे म्हणणे ठासून सांगत.
आमची मेस म्हणजे लांबच लांब हॉल होता. दारातून एका बाजूने आत आलं की दुसऱ्या टोकाला स्वयंपाकघर-कोठीकडे जायचे दार आणि त्याला लागूनच एक जुनी लाकडी टेबल-खुर्ची. हॉलच्या दोन्ही बाजूला जेवणाची पत्र्याचा टॉप असलेली टेबलं आणि मधला रिकामा पॅसेज ये जा करण्यासाठी. कॉलेज हॉस्टेल मोठं होतं, त्यामुळे मेस मध्ये राबता भरपूर असायचा. इथंही काम करणारी सगळी पोरं कोकणी, बनियन-हाफ चड्डीवाली होती. चपाती वाढायच्या ड्युटीवरचा दिन्या आणि आत स्वैपाक करणारे बुवा ही मुख्य माणसं. आम्ही तर मॅनेजरांच्या गावचे, म्हणून मग आम्हाला पण त्यांचा हात सैल असायचा. टेबलाशी बसून मॅनेजर लिखापढी, हिशेब बसलेले असंत. मधेच एकदम तरातरा उठून, एकतर स्वैपाकघरात अगर शेजारच्या त्यांच्या घरी जात. कधीकधी मेसचा हॉल क्रॉस करुन बाहेर जात. पण बाहेर जाताना पायात चप्पल अडकवून टोपी नीट करुन बाहेर पडत. त्याची लगबग बघून एखादे टवाळ सिनियर पोरगं, ‘काय बाहेर चालला का?’ असं विचारायचा. मग चार पावलं पुढे जाऊन, विचारात असल्या सारखे परत यायचे आणि त्या पोराला सांगायचे, ‘बाहेर चाललेल्या माणसाला कुठे चाललास असं विचारू नये. आई-वडिलांनी शिकवलं नाही का?’ पण हे सगळं कामाची लगबग किती त्यावर अवलंबून. कधी कधी काहीतरी पुटपुटत तसेच निघून पण जायचे.
माझा मोठा भाऊ माझ्या आधी पासून कॉलेजला आल्यामुळे, त्याचे व मॅनेजर यांचे गूळ-पीठ होते. आमच्या वडिलांचे आणि मॅनेजरांचे कोकणांतले गाव एकच. गावाच्या या एका अनामिक धाग्यामुळे आमच्या दोघांच्यावर त्यांचे अतोनात प्रेम होते. पुढे मी मेसमध्ये एकटाच येत होतो, त्यामुळे भावावरचे प्रेमही त्यांनी माझ्यावर वाहिलेले होते. मेसमधे सगळ्याच भाज्या आवडीच्या होत नसतात. एकदा दुपारी उशिरा जेवायला गेलो. गर्दी ओसरली होती. मी टेबलाच्या जवळच जाऊन बसलो. मॅनेजर, ‘याss..’ म्हणाले आणि एकदम त्यांच्या डोक्यात काय आलं माहिती नाही. ‘जरा थांबा.. आलोच.’ असं म्हणून तुरुतुरु बाहेर पडले. मी प्रश्नार्थक नजरेनं टेबल शेजारी पोळ्या हातात घेतलेल्या दिन्याकडं पाहिलं, दिन्याने फक्त मान वाकडी करून, ‘घरी गेलेत..’ अशी खूण केली. गरम पोळी आणतो सांगून दिन्या आत गेला आणि मी एकटाच वाट त्यांची पहात बसलो.
ती पाच मिनिटं पोटातल्या भुकेमुळे जरा जास्तीच लांबलचक वाटली. मॅनेजर अवतरले, हातात स्टीलचं फुलपात्र होतं ते समोर ठेऊन म्हणाले, ‘आता गिळा..’ त्यात केळीचं शिकरण होतं. त्या दिवशीची भाजी माझ्या अजिबातच आवडीची नव्हती, म्हणून या बाबाला काय वाटलं माहिती नाही, घरी जाऊन माझ्यासाठी शिकरण करुन घेऊन आले. दिन्याच्या गरम पोळ्या आणि शिकरण, त्या दिवशी माझी एकदम ऐषच झाली. हा दिन्या म्हणजे पण एकदम वल्ली होता. पोळी नको म्हणालो तरी जबरदस्तीनं, ‘गरम आहे, खावा..’ म्हणत वाढूनच जायचा. मी कायम उशिरा जेवायला जायचो, मग गर्दी नसायची. कधी कधी शेवटचे चार-पाचजण मेसमध्ये असायचे. दिन्या आम्हाला पोळ्या वाढणे बंद करुन डिक्लेअर करायचा, ‘जरा हात थांबवा.. बुवा भाजी करताहेत..’ ही भाजी म्हणजे आधीची भाजी संपल्यावर होणारा झटपट बटाट्याचा रस्सा असायचा. खरंतर जेवण झालेलं किंवा होत आलेलं असायचं. पण बुवांचा बटाट्याचा रस्सा म्हणजे, एकदम परत भूक पुन्हा प्रज्वलित व्हायची. ही भाजी मेसमध्ये काम करणाऱ्या पोरांच्यासाठी असायची, पण संबंध प्रेमाचे असल्याने त्यात आमचा पण वाटा असायचा. मग अशावेळी पुन्हा पाहिल्यापासून हरहर महादेव.
तेंव्हा नव्वद रुपये महिना मेस होती. त्यात दोन चेंज आणि एक फीस्ट असायची. खाडे पण धरले जायचे. चेंज म्हणजे लिमिटेड गोड आणि फीस्ट म्हणजे फुल्ल जेवण, पण मग रात्री मेसला सुट्टी. मग बरेचजण पोटापेक्षा जास्त जेवत, कारण रात्रीचा उपवास दुपारीच कव्हर करायला लागायचा. मॅनेजरांच्या इथे फीस्ट हा सोहळा असायचा. होस्टेलमधले कृपाचार्य-भीष्माचार्य भोजन समरात उतरायचे. मग पोरं आचरटा सारखी जेवत. माझा मोठा भाऊ आणि बर्व्याची पैज. बंधूंनी त्याला सांगितले, तू खाशील त्या पेक्षा एक गुलाबजाम जास्ती खाणार.. खरोखरच मेसला असा काहीही कल्ला चालत असे. पण इथं खायला घालायची इच्छाच प्रबळ होती. पैसे काय येतील हो.. अशी वृत्ती. एखाद्या विषयावरुन भोजन समारंभाला कधी कधी युद्ध स्वरुप पण येत असे. धमाल असायची.
वर्षाखेर कधीतरी मॅनेजर हिशेब करायला बसले, की याने पैसे दिलेच नाहीत, देतो म्हणाला होता. असे सांगत. तुम्ही टोपी टोपी घालून घ्यायलाच बसलाय.. मग असा टोमणा दिन्या मारायचा. असं काही झालं, की शेवटी एकदाची मान झटकून तो विषयच संपवायचे. पण त्यामुळे त्यांचा कधी हात त्यांचा आखडला, असे कधीच झाले नाही. हा जास्ती खातो, तो कमी खातो याच्या ऐवजी, “अरे काय तुम्ही खाता? आमच्या वेळी..” असे म्हणून कुठलीतरी लांब स्टोरी सुरु करत. एक दिवस एका कार्ट्याला भातात खडा आला. त्याने मोठयाने, ‘ओs मॅनेजर..’ असे मोठ्याने पुकारले. टेबलाशी चष्मा चढवून बसलेल्या मॅनेजरनी आधी चष्म्यावरुन एकदा पहिले आणि उठून तरातरा त्याच्या समोर उभे ठाकले. त्याने उंचावलेल्या हातातला तो खडा, त्यांनी मूल्यवान हिऱ्याप्रमाणे तळहातावर घेतला. मग चष्मा काढून त्याचे पूर्ण निरिक्षण केले आणि म्हणाले ‘अहो, खडा आहे..’ ते कार्टे उत्तरले, ‘तेच ते.. पण हा भातामध्ये कसा?’ ‘खरंच, हा भातामध्ये कसा? असं आपल्याशीच प्रश्नार्थक बोलत चेहरा सिरीयस केला. परत चष्मा डोळ्यावर चढवला आणि त्या पोराला म्हणाले, ‘अहो कुलकर्णी, तुम्ही इथं जेवायच्या टिकल्या किती देता?’ बावचळून पोरगे म्हणाले, “नव्वद रुपये.. पण त्याचा इथे काय संबंध?” मॅनेजर शांतपणे टेबलाच्या दिशेने वळत म्हणाले, अहो नव्वद रुपयात वीट कशी परवडणार? काहीतरी विचार करा तुम्हीच..’ या नंतर जेवणाऱ्या सर्वांना, पहिला बाजीराव युद्धावर असताना शेतात घोडा थांबवून कसा जेवण करायचा यावर ऐकावे लागले. त्यावर्षी होस्टेलला बरेच जोशी झाले होते. त्यातल्या एकाचे आई-वडील लंडनला होते, म्हणून त्याचे नामकरण ‘लंडन जोशी’ केले होते. माझ्या भावाला वाय.डी. म्हणून ओळखत, त्यामुळे मी वाय्ड्याचा भाऊ होतो.
महिन्यातून एकदा फीस्ट असायची. त्या दिवशी पोटभरुन खायची संधी. रात्री मेस बंद असल्यामुळे तुडुंब जेवून सगळे सुस्त झोपत. फ्रुट सॅलेड असलं की ताटात फक्त वाटी. नो चटणी, नो कोशीबींर, नो मीठ. ताटामध्ये वाटी ठेऊन, फक्त फ्रुट सॅलेड हाणायच. एकदा फीस्टच्या दिवशी मी लवकर गेलो. मेसला गर्दी होती. मॅनेजर म्हणाले, ‘आज गडबड?’ मी मान डोलावली. मग माझा हात धरून, आत कोठीच्या खोलीत टेबलखुर्चीवर बसवलं. समोर ताट आणि वाटी ठेवायला लावली. मग आतून स्वतःच एका पातेलंभर फ्रुटसॅलेड आणि डाव आणून समोर ठेवलं आणि म्हणाले, ‘गचडा आता..’ महिन्यातून एकदा फीस्ट असायची. त्या दिवशी पोटभरुन खायची संधी. रात्री मेस बंद असल्यामुळे तुडुंब जेवून सगळे सुस्त झोपत. फ्रुट सॅलेड असलं की ताटात फक्त वाटी. नो चटणी, नो कोशीबींर, नो मीठ. मध्ये वाटी ठेऊन फक्त फ्रुट सॅलेड हाणायच. एकदा फीस्टच्या दिवशी मी लवकर गेलो त्यामुळे मेसला गर्दी होती. मॅनेजर म्हणाले, ‘आज गडबड आहे?’ मी फक्त मान डोलावली. मग माझा हात धरुन, मला आत कोठीच्या खोलीत टेबल खुर्चीवर बसवलं. समोर ताट-वाटी ठेवायला लावली. मग आतून स्वतःच पातेलंभर फ्रुटसॅलेड डाव घालून समोर ठेवलं आणि म्हणाले, ‘गचडा आता..’ गचडा म्हणजे जेवा सुखाने.. हा त्यांचा अतिशय प्रेमाचा शब्द. पुढं होस्टेलचे बाहेरच्या लोकांसाठी नियम जाचक व्हायला लागले आणि मी दुसरीकडे जेवायला जायला लागलो. त्यामुळे अधून मधून मॅनेजर दिसायचे, पण भेटी-गाठी होत नव्हत्या. मध्ये वर्षे सरली आणि एक दिवस बाजीराव रोडवर चक्क चितळ्यांच्या दुकाना समोर अचानक समोर मॅनेजर.. नमस्कार चमत्कार झाले आणि मॅनेजरनी त्याच जुन्या प्रेमाने विचारलं, ‘काय मग.. आता गचडायला कुठं?’ मी म्हणालो, ‘अहो आता लग्न झालंय, घरचीच मेस.’ वाढलेल्या पोटाकडे पहात म्हणाले, ‘हो, ते दिसतच आहे..’ नेहमी सारखे गडबडीत होते त्यामुळे त्यांच्या नवीन ठिकाणाचं पत्ता दिला. “या एकदा नक्की.. असं प्रेमाचं निमंत्रण देऊन मॅनेजर गर्दीत दिसेनासे झाले.
Recent Comments