Gogate Aaji – गोगटे आजी
गावातले सगळे त्यांना गोगट्याची म्हातारी.. असेच संबोधत. या गोगटे आजी, माझी आज्जी-माईच्या चांगल्या ओळखीच्या आणि मैत्रीतल्या होत्या. नगरपालिकेसमोर पहिल्या मजल्यावर आम्ही रहात होतो. शेजारच्या बैठ्या घरात कमलाताई आणि त्यांच्या शेजारी गोगटे आजी. त्यांचं घर दुमजली होतं तरी तेंव्हा वरचा मजला बंद असल्याने, अजूनच अंधारलेलं होत. गावाकडंची एकाला एक लागून घरं, बाजूला शेजारच्यांनी भिंत, तिथं खिडकी कुठून येणार? त्यामुळं ही घरे गार आणि अंधारी असायची. या घरात तळमजल्यावर आजी एकट्याच राहत. हट्टानं कायम एकटी राहणारी माणसं, एकलकोंडी आणि तिरसट होतात असा माझा अनुभव आहे. कदाचित गोगटे आज्जीचे अनुभव वेगळे असू शकतील, ज्यांनी त्यांना असं कडवट -विचित्र बनवलं असेल. त्याचा स्वभाव सुद्धा खूप संशयी, कोणी त्यांचं काही घेऊन जाईल, म्हणून सारख्या त्या अस्वस्थ असायच्या. म्हातारीने समोरच्यावर कधी विश्वास, अगदी देवावरही ठेवला नसेल, असं बाकीचे म्हणायचे.
माझी चित्रकला तेंव्हा पासून बरी असल्याचे, आमच्या माईने त्यांना सांगितले होते. म्हणून त्यांनी माईला सांगितले, ‘मला देवघराच्या भिंतीवर काही ‘अक्षरे’ लिहून पाहिजेत, तुमच्या नातवाला पाठवा.’ आज्जींचे घर अंधारे-अंधारे, एकट्याच राहायच्या, त्यामुळे दिवे न लावता, त्यात त्या भुतासारख्या एकट्याच रहात. तेंव्हा त्यांच्या घरात एखादा झिरोचा बल्ब असलाच, तर त्याचा मिणमिणता प्रकाश असायचा, पण वीज असली तरच त्याचे भाग्य फळफळायचे.
त्यावेळी मला अंधाराची जबरदस्त भीती वाटायची, म्हणून मला तिथे जाणेच नकोसे होते, पण आज्जीने, त्या कश्या एकट्या राहतात, त्यांचे हे छोटेसे काम तू केले पाहिजेस, असे मला खूप पटवले आणि केवळ माझ्या आज्जीच्या प्रेमासाठी एकदाचा मी ब्रश, पेन्सिल, फूट-पट्टी घेऊन त्यांच्याकडे जायला निघालो. जाताना मध्येच त्यांच्या शेजारच्या कमलाताईंच्या दारात रेंगाळलो. कमलाताई वयाने मोठ्या असल्या, तरी त्यांचे माझे खूप चांगले पटत असे. कमलाताई आणि गोगटे आजी या सख्या शेजारणींचे एकदम हाडवैर. कमलाताई आजींना त्याकाळात, मला लै भारी वाटणाऱ्या शिव्या, अगदी सहज देत असत. ही भांडणे तेंव्हा फुल्ल स्टिरिओफोनिक आवाजात होत. या भांडणाचा शेवट, ‘मेली मरत पण नाही म्हातारी..’ असा उल्लेख करुन कमलाताई त्यातून रिटायर होत. रेंगाळण्याची लिमिट संपल्यावर, मग हिय्या करुन पावलं आज्जीच्याकडे वळवली..
पडवीतून आत गेल्यावर एक छोटी आडवी खोली, तिथं पायात चपला असतील तर त्या काढायच्या. मग आतला जरासा बुटका, मोठ्या चौकटीचा, कावेच्या रंगात रंगवलेला दरवाजा. त्यातून तुम्ही मान वाकवून गेला नाहीत तर कपाळमोक्षच. आत पाऊल टाकण्या आधी, मी दरवाज्यातून आत डोकावून पाहिलं. आत फक्त गडद अंधार आणि अंधार. त्या काळात मी अंधाराला सॉलिड टरकून असायचो. त्या गडद अंधाराला उभा चिरत, खालच्या सारवलेल्या जमिनीवर पडलेला सूर्याचा एकमेव छोटा कवडसा पडला होता, अगदी गोविंद निहलानींच्या सिनेमॅटोग्राफीची आठवण करून देणारा.. त्या कवडशाने सभोवतालचा अंधार अजूनच गडद झाल्या सारखा वाटला. इतक्यात कुठूनतरी ‘कोण आहे?’ असे दरडावलेले शब्द आले. आता नाइलाजच झाल्याने, मी नाव सांगून, त्या अंधारात घुसलो आणि कवडश्याजवळ जाऊन उभा राहिलो.
जरा वेळ जाताच जरा-जरा दिसू लागलं. उजवी कडच्या अंधारात तक्याला टेकून बसलेल्या आज्जीची किंचित वाकलेली आकृती उठून उभी राहिली. त्यांनी मागे यायला सांगितल्यावर, मी त्यांच्या मागं-मागं स्वयंपाकघरात गेलो, तिथं वरच्या कौलात लावलेल्या काचेमुळे जरा जास्तीचा प्रकाश होता. म्हणजे आज्जीचा चेहरा आणि सर्व गोष्टी लख्ख ओळखू येत होत्या. नारायण धारपांच्या गोष्टीत जसा एक गूढपणा असायचा आणि वाचकांना अस्वस्थ करायचा, तसं तिथं गेल्यावर मला धारपांच्या कथेतच जातोय की काय असं वाटायचं.
त्या काळी मी तर अंधाराला सॉलिड टरकून असायचो. आतून कुठून तरी, ‘कोण आहे?’ असे दरडावलासारखे शब्द आले. मी नाव सांगून त्या अंधारात घुसलो, मग जरा-जरा दिसू लागलं. मग त्यांच्या मागेमागे स्वयंपाक घरात गेलो. तिथं उतरत्या कौलारु छपरात लावलेल्या, दुधीकाचेमुळे जरा जास्तीचा प्रकाश होता. म्हणजे आज्जीचा चेहरा ओळखण्या एव्हढा. नारायण धारपांच्या सर्व गोष्टीत एक गूढपणा असायचा, तसं तिथं गेल्यावर गूढ वातावरणात गेलो आहोत असंच मला वाटत होत.. स्वयंपाकघरात बाजूला एका मोठ्या जाड भिंतीमधल्या कोनाड्यात आज्जींचे देवघर होते. त्याच्यावर कुठे लिहायचे ते त्यांनी दाखवले. नीट सुवाच्च लिही, असं सांगून आज्जी त्यांच्या कामाला लागल्या.. एकुणात तिथे प्रकाश चांगला असल्याने, अर्ध्या तासात मान उंचावून, स्टुलावर उभे राहून भिंतीवर श्री गजानन प्रसन्न आणि अजून तत्सम काही, ब्रशने लाल रंगात लिहिण्याचे माझं काम मी संपवलं. तिथंच काही बाही खुडबुड करणाऱ्या आज्जींना, झालं, लिहून मी जातो.. असं सांगताच. त्यांनी तोंडातली स्तोत्रे पुट्पुटतच, मला थांब.. अशी खूण केली.
ह्रस्व-दीर्घच्या चुका न करता मी लिहू शकलो, याचा माझ्यापेक्षा जास्ती आनंद गोगटे आज्जींना झाला होता. स्वयंपाकघरातल्या उभ्या करुन ठेवलेल्या जुन्या लाकडी पाटांपैकी, एक जाडसर पाट खाली टाकून, त्याच्यावर मला बसायला लावले आणि भांड्यातून एक वाटी शोधून त्यात काहीतरी खायला दिलं. यानंतर लै वेळा त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या भाषेत ‘अक्षरं’ सुद्धा काढली, पण त्यांच्याशी ओळख झाल्यावर, अंधाराची आणि कंबरेत वाकत चाललेल्या गोगटे आजींची भीती नंतर कधीच वाटली नाही.
मी आणि पल्याडचा हेम्या आमच्या घरच्या कौलांवर चढून, कमलाताईंचा पत्रा आवाज न करता पार करुन, गोगटे आजींच्या बंपराच्या झाडाची बंपरे चोरत नव्हे ढापत असू.. पण ते आंबटढांण फळ मला कधीच आवडले नाही, पण कुठेतरी कुठेतरी गोगटे आज्जींनी माझ्यावर विश्वास टाकला होता, त्यामुळे पुन्हा असले ढापाढापीचे उद्योग कधी केले नाहीत. गोगटे आजी, आमच्या माईच्या, देवळात जाणाऱ्या मैत्रिणीनं पैकी एक. मीही आज्जीबरोबर जाऊन जप वगैरे करत असे, उत्सवाला सुद्धा जात असे. पण एकीकडे देवाचं सगळं प्राणापलीकडे करायचं आणि दुसरीकडे त्याच्या बरोब्बर विरुद्ध वागायचं. गोगटे आजीचं असं वागणं बघून, कुठेतरी देवाबद्दल खूप कुतूहल निर्माण झालं होत खरं.
Recent Comments