Kanis, Dev and Me
कणीस, देव आणि मी..
ऑफिसची कामं संपवून आम्ही दोघे नवरा-बायको, सकाळी लवकर उनाडायला बाहेर पडलो होतो. मजल दरमजल करत, महाबळेश्वर मुक्कामी पोहोचलो. उरलेला दिवस तिथे एन्जॉय करुन, दुस-या सकाळी दहाला चेक आऊट करुन बाहेर पडलो. नक्की काय करायचं ठरवलं नव्हतं. जसं सुचेल आणि पटेल ते करत, रात्री मात्र घरी पोहोचायचा बेत मात्र पक्का होता.
वेण्णा लेककडे वळणं घेत, खाली उतरत होतो. डावीकडच्या बोटिंग जवळून जाताना, बायकोने “थांब” सांगितलं. वेण्णाच्या बोटिंग बूथ जवळच, देवआनंदच्या नवकेतन शूटिंग क्रूचे शूटिंग सुरु दिसले. तिथंल्या उंच मातीच्या डोंगरावर, वर उभा राहून, खालच्या त्याच्या शूटिंग क्रूला, देवसाब काही सूचना करत होता. “मला देवानंदला बघायचं आहे.” म्हणत ती खाली उतरली सुद्धा. “म्हाता-याला काय बघायचं?” असं म्हणून तिला उडवून लावण्याचा माझा प्रयत्न, असफल ठरला.
पुढं जाऊन कार पार्क करुन झक्कत खाली उतरलो. कणीसवाल्याकडं कणसाची (हल्ली कणसाला स्वीटकॉर्न असं म्हणतात) आॅर्डर दिली. गडबड कसली? असं त्याला विचारताच कणीसवाल्याने, “चारपाच दिवस झाले, देवसाहेबांच शूटिंग चालू आहे.” असं सांगितलं. तेव्हा वेण्णा लेकवर लॅण्ड डेव्हलपमेंट आणि लेव्हलिंगचे मोठे काम सुरु झाले होते. शाळा सुरु होत्या, सुट्ट्या नसल्यामुळं, स्पॉटवर नेहमीची गर्दी नव्हती.
उंच मातीच्या टेकाडावर, ताठ उभा राहून, देव शूटिंग प्रोग्रेस पहात होता. त्याच्यामागे सगळी गर्दी एकवटली होती, म्हणून मी समोरच्या टेकाडावर मी थांबलो. समोर उंच क्रेनवर कॅमेरामन बसलेला. खालच्या सखल जागेत माॅनिटर ठेवलेले. सूचना दिल्यावर देव खाली आला आणि माॅनिटर समोर बसला. कॅमेऱ्याच्या मुव्हमेंट्स सुरु झाल्या आणि दिलेल्या इंस्ट्रक्शन्स प्रमाणे तो शेवटच्या क्लोजअपवर थांबला. देवने कॅमेरामनला, “कॅमेरा आउट फोकस है, चेक कर…” अशी सूचना केली. म्हाता-याच्या डोळ्यावर, चष्मा नसतानाही त्यानं कॅमेरामनला चूक खटकन सांगितली. मॅटिनीत पडद्यावर बघितलेला, त्याचं ठेवणीतलं हसू दाखवणारा देव आठवला. आणि तिथंच ठरवलं, आता देवसाब बरोबर शेकहँड करायचाच.
शाॅट संपताच देवसाब समोर, त्याच्या सारखीच चपळाई वापरुन उभा राहिलेला मीच होतो. देवने एकदा रोखून माझ्याकडं पाहिलं, त्याचे स्पेशल स्माईल दिलं आणि हात पुढं करून म्हणाला, “आय ॲम देव आनंद.. प्लीज टू मीट यू..” तिथं त्याला भेटायला आलेल्या प्रत्येकाला, तो तितक्याच अदबीने असं सांगत, शेकहँड करत होता. या छोट्या गर्दीत, एक अँग्लो-इंडियन तरुण म्हातारी होती. ती म्हणाली, “देव अब हम दोनो बुढ्ढे हो गये.. लेकिन, मै जवान थी, तब तेरे उपर मरती थी.”
शिरीष कणेकरनं लिहिलं होतं- कधीही देवसाबला फोन केला तर, “हॅलो देवआनंद स्पीकिंग..” असं उत्तर यायचं. सेक्रेटरी, अलाणा फलाणा, कोणी मधे नाही. ग्लॅमरवल्ड मधले हळकुंडाच्या तुकड्या शिवाय, पिवळे-निळे झालेले बरेच स्टार्स बघितले आहेत. पण दातातली फट दाखवत, शेक हँडसाठी हात पुढं करणारा देवसाब, या सर्वांच्या कितीतरी पुढं होता. आज तो असता, तर या २६ सप्टेंबरला तो चक्क शंभर वर्षांचा झाला असता. हो, एक सांगायचंच राहिलं. सगळ्यांना भेटून झाल्यावर, त्याच्या असिस्टंट पोऱ्याच्या खांद्यावर हात टाकून देवसाब म्हणाला, “चलो, भुट्टा खाते है..”
Recent Comments