Select Page

चार गोष्टी गमतीच्या..

Khadiwarcha Shravan


आमची मराठी शाळा गावाबाहेर थेट मोठ्या डोंगरावर होती. एका टेकडीचा पुढे आलेला एक कोपरा कापून, त्याच्या पुढच्या सपाटीवर शाळा बांधली होती. या शाळेला १७० वर्षे झालीत. शाळेमागे अजून वरती तिरका चढत जाणारा डोंगर. त्या काळात पाऊस पण कोसळणारा पाऊस होता. शाळा पावसातच सुरु व्हायची. धबाधबा पावसातून पाणी उडवत आणि अर्धे भिजत जायचो. सगळ्या पोरांचे तळपाय एकदम पांढरे स्वच्छ. मग श्रावण आला, की झिम्माड पावसाळ्याला जरा उतार पडल्यागत होत असे. दोन मोठ्या सरींच्यामधे, असलीच तर जराशी झिरमिर असायची. मधेच काळे ढग पांगून, थोड्या निरभ्र दिसणाऱ्या आकाशात, सूर्य कुठे आहे, हे जरा कळायचे इतकेच. 

शाळेमागच्या हिरव्यागार डोंगरावर, जमिनीला चिकटून, मातीवर आलेल्या एकांड्या पानातून, दोन इंची लांब, दांडीची पांढरी फुलं डोकवायची. एका दिवसात वरचा डोंगर या फुलांनी भरुन जायचा. खुरट्या गवतात वाऱ्यावर डोलणारी ही फुलं आली, की महिनाभर श्रावण सोमवारी, शाळा अर्धाच दिवस, याचा खरा आनंद व्हायचा. अशात शाळेच्या डोंगरावरुन हिरवा साज ल्यायलेली महादेवखडी खुणवायची. श्रावणी सोमवारी शाळा सुटली, की डोंगरावर जाऊन, वेचलेली  फुलं, काळजीपूर्वक कोणाच्या एकाच्या शर्टाच्या खिशात घालायची. मग नेहमीच्या घराच्या वाटेने न जाता. डोंगरावरच्या नसलेल्या वाटांवरुन, महादेवखडी कडे पावले वळत. 

महादेवखडीचं काय? म्हणाल तर, कोल्हापुराकडून येणारी एसटी, बहिरेवाडीच्या खिंडीतून वर आली, की डोळ्यांना हा खडीचा डोंगर पहिल्यांदा दिसायचा. त्यावर एक महादेवाचं छोटं देऊळ होतं. म्हणून मग तिची झाली महादेवखडी. कानात काहीतरी सांगत पुढे जाणाऱ्या, खडीवरच्या भन्नाट वाऱ्यातून, खालचं आमचं गाव, शेतांचे हिरवे तुकडे, नदीच पात्र, असं चित्र, आमच्या मनावर कायमचं उमटून राहीलं आहे. दंगामस्ती करत, सगळी पोरं, खडीवरच्या महादेवाला जायची. आम्ही नेलेल्या डोंगरावरच्या फुलांची दखल, देवळातला गुरव घेत नसे. पण त्याची आम्हाला फिकीर नव्हती. एकदा तर देवळाच्या मागे सगळ्यांनी फुल ठेवली होती. 

पहिल्या श्रावण सोमवारचा, आमचा हा न चुकलेला क्रम. देवळा सभोवताली खुरट्या गवताचं मोठं उतार असलेलं पठार. त्याच्यावर शेवटच्या टोकावर जोरात पळत जाऊन, खडीला वळसा घालून, गावाबाहेर पडणाऱ्या रस्त्यावरच्या लहान एसट्या बघायच्या. एकदा एसटी दिसेनाशी झाली, की त्या टोकावरुनच तोंड फिरवून मागं पळत निघायचं, ते देऊळ ओलांडून, त्याच्या मागच्या टेकडीच्या मध्यावरच्या वडाच्या झाडाकडे. 

झाडाच्या कोवळ्या, लांबच लांब पारंब्या पकडायला मोठी शर्यत लागायची. झाडाखाली एक खोल खड्डा होता. एकदम जोरात झोका घेतला, तर भणभणणाऱ्या वाऱ्यात, पाय त्या खड्ड्याच्या पल्याड जायचे. ज्यांचं धाडस नव्हतं ते, विरुद्ध बाजूला हळू झोक्याचा आनंद घेत. या ठिकाणी बराच आरडाओरडा होत असे. हे उरकल्यावर मग टेकडी चढून, कंबरभर ओल्या गवतातून शिवाजी महाराजांच्या सिहासनाकडे जायचं. “विशाळगडला जाताना महाराज इथं बसलेले..” असं एका पोरानं प्रचंड गंभीर होऊन कधीतरी सांगितलं होत. तेंव्हापासून तो खुर्चीसारखा लांब दगड, आमच्यासाठी महाराजांचं सिंहासन बनला. 

एक सांगायचं राहूनच गेलं. महादेवखडीवर घायपाताची चिक्कार झुडपं होती. हाताला काटे न लागता त्यातली एक पोपटी कोवळी पात काढून, तलवारी सारखी नाचवत सगळीकडे फिरायला मस्त मजा यायची. समजा एकालाच अशी तलवार मिळाली, तरी बाकीच्या सगळ्यांना त्याच्यामागे, मावळे म्हणून मोठ्याने ओरडत फिरायला कोणाला काही वाटत नसे. 

या सगळ्या गोष्टी पाऊस किती आहे यावर अवलंबून असत. खडीच्या पल्याड, लांबवर बुडणारा सूर्य चुकून दिसलाच, तर अनिमिष डोळ्यांनी सगळे पहात असू. एकदा अंधार पडायला लागला की मग गावातले दिवे कधी लागतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. पायऱ्या उतरताना पाय जड व्हायचे. पण लख्खकन अपेक्षित दिवे लागले, की ओल्या पायर्यांची चिंता न करता, पायाला एकदम गती यायची आणि सगळ्यांना बिना तक्रार, धडाधडा पळत खाली जायला लागायचं. 

आता वयाने मोठे झालो, केस पांढरे झाले. कधीतरी  “पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले..” असे शब्द जेंव्हा कानावर पडतात, तेंव्हा खडी वरुन श्रावणात पाहिलेली दृश्यं, डोळ्यासमोर उभी राहतात आणि पाडगावकरांचे शब्द, त्यांचे न राहता, आपलेच होऊन जातात.