Select Page

चार गोष्टी गमतीच्या..

Malabh

मळभ  
(पुनवा २०२३ दिवाळी अंक कथा स्पर्धा – पारितोषिक विजेती कथा)

    राजूचा गोरा चेहरा, संताप आणि रडण्याच्या सीमारेषांवर होता. बेभानपणे थरथरणारे दोन्ही हात, काही केल्या, स्थिर व्हायचे नावच घेत नव्हते. कानशिलं लालेलाल झाली होती. कोणत्याही क्षणी डोळ्यांच्या कडांमागून, पाणी वहायला लागेल असं वाटत होतं. तो मुश्किलीनं स्वतःला सावरून धरायचा प्रयत्न करत होता. भावनांचा कढ चढता राहिला, तर आपण तुकड्या-तुकड्यात कुठेतरी वाहून जाऊ, या भीतीनं तो स्वतःला आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.

    रविवारचा दिवस, नेहमीची सकाळ जरा आळसावलेली होती. शेजारचा बब्या कधीपासून खेळायला हाका मारत होता. तिकडं जायची इतकी घाई होती, नको तो नाष्ता-खाणं असं झालं होतं. पण या आज्जीचं स्टोव्हवरच सांज्याचं पातेलं, काही केल्या खाली उतरायचं नावच घेत नव्हत. “खाल्या शिवाय अज्जिबात बाहेर जायचं नाही हो..” असा दम आज्जीनं कधीच देऊन ठेवला होता. आज्जीला गुंडाळून, तस्सचं जाणं शक्य नव्हतं, मग तक्रार थेट बाबांच्या पर्यंत गेली असती. बाहेर गॅलरीत गेलं, तर बब्या पुन्हा हाका मारणार, त्यापेक्षा आतच बसण्याचा विचार जास्त चांगला होता, पण खेळाची उर्मी मात्र तसं करु देत नव्हती. आज्जीटलीचा राग वाढत चालला होता.

    वेळ पुढे न सरकता, एकाच जागी गोलगोल फिरतो आहे, असं वाटत होत. त्याचवेळी आज्जीनं सांजा भरलेली ताटली राजूसमोर ठेवली. वरुन कोथिंबीर टाकणार इतक्यात, कोंडून धरलेला राग उफाळून वर आला. राजूनं गरम चमच्यानं टाकलेली कोथिंबीर उडवून लावल्यावर मात्र, आज्जीचा स्वर कडक झाला. “खाली सांडू नकोस, न सांडता खा..” पटकन खेळायला जाऊ न देता, जास्तवेळ घरीच डांबल्याचा राग इतका मोठा झाला होता, की राजूनं  “मला नको तुझा सांजा का फांजा..” असं म्हणून खाण्याची ताटली, रागानं जोरात दूर ढकलली.

    इतका वेळ बाहेर असलेले बाबा नेमके त्याचवेळी तिथं आले. रागाने केलेले दुरुत्तर आणि कृती बघून, त्यांचा पारा एकदमच चढला. त्यांनी राजूला उठून उभं रहायला सांगितलं. रडक्या आवाजात काही कारणं सांगायचा राजूचा प्रयत्न, बाबांनी हाणूनच पाडला. आता नातवाला दणके पडू नयेत, म्हणून, आजी बाबांच्या जवळ, “जाऊ दे, लहान आहे. त्यानं मुद्दाम नाही केलं.” अशी रदबदली करायला लागली. त्यानं राजूचा आजीवरचा राग अजूनच वाढला. खवळलेले वडील विसरून तो आजीवरच ओरडला, “तू जा इथून..” आता बाबांचा संताप थाड्कन वर आला. आजी मधे पडली नसती, तर राजूला रट्टे नक्कीच मिळाले असते.

    “आत्ताच्या आता आजीची माफी माग.” परिस्थिती फारच भीषण होती, बाबा म्हणतील ते करण्याची राजूची अज्जिबात इच्छा नव्हती. पण संतापलेल्या बाबांसमोर, त्यांचं ऎकण्या शिवाय गत्यंतरच नव्हते. रडक्या हळू आवाजात सुरवात केली, तर बाबा म्हणाले, “मोठ्या, स्वच्छ आवाजात सांग, सगळ्यांना ऐकू येऊ देत.” आधीच सगळं डोकं बधीर होऊन गेलेलं, कानशिलं लालेलाल झालेली. त्यात सगळ्यांच्या समोर झालेला अपमान. स्वयंपाकाच्या सुशिलाबाईंच्या तिथं असण्याचा सुध्दा, राजूला राग यायला लागला होता. कशीबशी माफी मागून झाली. आज्जीनं बाबांना काहीबाही सांगून तिथून बाहेर पिटाळलं. पण बाबा जाताना, “वाढलेलं सगळं आधी निमूटपणे संपवायचं आहे.” अशी सज्जड तंबी देऊन गेल्यामुळे राजूची अजूनच गोची झाली. तोंडातले घास काही केल्या खाली उतरत नव्हते, त्यांनी गालातच ठाण मांडल्यामुळं, राजूचं तोंड मारुती सारखं झालं होतं. पाण्या बरोबर घास गिळताना, बंड करायची उर्मी जागी होत होती. पण काहीही मार्ग नसल्यामुळे, त्याची अजूनच कोंडी होऊन गेली होती. “असं करु नये बाळा, तू शहाणा मुलगा ना..” असं काहीतरी सुशिलाबाई सांगत होत्या. पण आता राजूच्या सगळ्या संवेदना बधिर झाल्या होत्या. हळूहळू करत, सगळी ताटली रिकामी झाली आणि तोंड सुद्धा.

    राजू तडक घरातून मागच्या जिन्याने परड्यात आला. आता त्याला बब्याबरोबर जायची इच्छाच राहिली नव्हती. बब्या भेटलाच नाही तर बरं, असंही वाटत होत. पण तो आपल्याला शोधून काढेल, ही भीती सुद्धा मनाच्या कोपऱ्यात होतीच. मग कुठं जायचं? हा प्रश्न समोरच आ वासून उभा होता. काही न सुचल्यानं तो पायातली शक्ती गेल्यासारखा, आंब्याच्या झाडाला पाठ घासत उगाच खाली बसला. तसंच चवड्यावर बसून रग लागली आणि मग त्यानं आपलं बूड आरामात जमिनीला टेकवून वर पाहिलं. शेजारच्या फणसाच्या झाडाचं पिवळं पान, वरुन सरळ त्याच्याच समोर येऊन पडलं. फणसाच झाड सुद्धा त्याच्या बाजून आहे, असं उगाच त्याला वाटून गेलं. आज आपण पल्याडच्या प्राजक्ताची फुलं, झाड हलवून पाडली नाहीत हे आठवलं, पण तरीही तो परत विचारात बुडून गेला.

    पेरुच्या झाडावर बसलेली मैना कर्कश्य ओरडत होती. भानावर येऊन एकदम हात उंच करुन तिला उडवून लावल्यावर, मग राजूला जरा बरं वाटलं. खदखदणारा राग आता जरा शमला होता. पण तो यासाठी बाबांना कधीच माफ करणार नव्हता. मोठं झाल्यावर काय करायचं? आणि बाबांना कसं झाडायचं हे तो आत्ताच ठरवून टाकणार होता. कुठून कोणजाणे, तडक घर सोडून आपण सरळ कोल्हापूरला जायचं आणि एकटं राहायचं.. निवत चाललेल्या मनातून आलेला विचार, आता त्याला एकदम पटला. हे एकदम बरोबर आहे. पहिलं मन म्हणालं, पण हे अमलात कसं आणायचं? एसटीनं जायचं तर खिशात पैसे नाहीत. मग? असू देत, नसले, तरी आपण चालत तर जाऊ शकतो ना? दुसरं मन म्हणालं, अरे बापरे..

    एक बंडखोर मन पुढची पावलं टाकायला सांगत होतं, तर दुसरं मन पहिल्यात खोट काढायला लागलं. मनातल्या सवाल जबाबात राजू अजून गुंगून गेला असता. पण घरातून सुशिलाबाईंनी त्याला मारलेली हाक ऐकू आली. बहुतेक बब्या परत आला असणार म्हणून त्या हाका मारत असाव्यात. राजूने प्रतिसादच दिला नाही. मान उंचावून तो उंचावरची हलणारी झाडाची पानं एकटक बघत राहिला. बब्या निघून गेला असावा, हाका थांबल्या. मग अजून पाच मिनिटे जाऊ देऊन, राजू मागच्या दाराने, हलक्या पावलांनी जिना चढून आत गेला. आज्जी किंवा सुशिलाबाईंनी त्याला बघण्याच्या आत, पटकन पायात चप्पल घालून तो पुढच्या जिन्याने बाहेर आला. हळूच इकडे तिकडे बघितलं, तर बब्या दिसला नाही. मग राजूने पटकन बाजार पेठेचा रस्ता धरला.

    रस्त्यामधून चालणे जास्त धोकादायक, कारण खालच्या अंगाने बब्याला दिसलो, तर तो पण पळत बरोबर आला असता. आता ठरवलेल्या ध्येयात, राजूला बरोबर कोणी नकोच होते. तो आता एकदम जाणता आणि सक्षम बनला होता. अशावेळी घरांच्या पुढच्या कट्ट्यावरुन चालत जाणे सुरक्षित होते. पावसात शाळेत जाणारी सगळी पोरं, अशीच कडेने, वळचणी वळचणीने पुढे जात. वाटेत कोणीतरी काय रे कुठे चाललास? असं विचारायची भीती मनात घर करुन होती. वाटेत नंदूचे रेडिओ रिपेअरिंगचे दुकान होते. कधी बाबांच्या सोबत गेलं, की तिथं थांबावं लागायचं. आज मात्र निळसर डोळ्यांचा काका कामात होता, त्याच राजूकडे लक्षच गेलं नाही. वेध घेणारे त्याचे डोळे आठवून राजूला उगाचच विचित्र वाटायला लागलं. सगळे त्यांच्या त्याच्या दैनंदिन कामात व्यस्त होते, राजूला कोणीच टोकलं नव्हतं. पहिलं मन मात्र अजून जोशातच होत. असू देत नाही कोणी विचारलं, बरच झालं ना. आता सरळ कोल्हापूर गाठायचं.

    पण इतका वेळ जोशाने पुढे पुढे जाणारी पावलं, तितकीशी वेगात पडत नव्हती. कुणीतरी वाटेत हाक मारावी, बोलावं, असं राजूला वाटायला लागलं. बुरुड आळीत वळल्यावर हिरव्या बांबूच्या कामट्यांचा वास आला. तिथं रवी रेंगाळला. लांबच लांब काढलेल्या कामट्यांची मोठी षट्कोनी भोकांची डालगी बनवायचं काम सुरु होत. काही काम नसताना तिथं अजून थांबणं बरोबर नाही, असं वाटून राजू पुढं सरकला. याच गल्लीत बाळूचं सायकलचं दुकान होत. तिथं थांबावं असं वाटलं खरं, पण तिथं बाळू बरोबर दोनचार जण बोलत उभे होते.

    मग तो तसाच जरा हिरमुसल्यागत पुढे निघाला. शेजारच्या गल्लीतून, त्याच्या वर्गातला दिलीप समोरुन आला. मग दोघेही मधेच उभे राहून, इकडचं तिकडचं बोलत राहिले. दिलीपने विचारलं, इकडं कुणीकडे निघालास? पण त्याच उत्तर टाळून, राजू त्याच्याशी इतरच बोलत राहिला. पण मग दिलीप त्याला म्हणाला, “चल, दुकानी चाललोय, येतोस?” दिलीपच्या वडिलांचं मेन रोडवर चौकात किराणा दुकान होत. इथं राजूच पाहिलं मन जोरात म्हणालं, नाही नाही.. पण राजूच्या तोंडून मात्र, नाहीरे.. परत घरी जायचं आहे, वाट बघतील.. असे शब्द हळूच बाहेर पडले.

    पहिलं मन थांबायलाच तयार नव्हतं. ते बेटं चालत चालत कधीच पुढं गेलं होत. पण दुसरं मन मात्र जडशीळ लोढणं होऊन, पायात बसलं होत. पुढं गेलं की उजवीकडे एस्टी स्टँड आणि डावीकडे वळलं की कोल्हापूरचा डांबरी रस्ता. आता उतरणीचा रस्ता लागला, तो संपला की त्याला लागूनच नदीवरचा दगडी पूल. पुलाच्या अलीकडं नगरपालिकेची ऑक्ट्रॉयची छोटी कौलारु टपरी होती. हर्डीकरांचा शशी तिथं काम करायचा. गावात सगळे एकमेकांना एकेरी नावाने हाक मारत, म्हणून तो शशी, खरंतर राजू त्याला दादाच म्हणायचा. सूर्य डोक्यावर आल्यावर तिथून पुढं जाताना बघून, त्यानं विचारलं, “काय रे कुठं निघाला आहेस?” तर उत्तर देताना तत पप व्हायची. झालं.. नुसत्या विचारांनीच पावलं अजून हळू पडायला लागली.

    आता जास्त रेंगाळणं धोक्याच. पहिलं मन रस्त्यावर पुढे जाऊन लगाम ओढायला लागलं होत. त्याच्या अशा ओढण्याने राजूला त्रास व्हायला लागला. पण आता त्याला दुसरे कसले तरी अनामिक दोर पुढे जायला देत नव्हते. ऑक्ट्रॉय नाक्यात गर्दी नव्हती आणि मुख्य म्हणजे तिथं शशी बसलेला नव्हता. एकदम हायस झालं. कदाचित शशी हा राजूचा शेवटचा आधार असावा. दोन मनाचं द्वंद्व राजूला नाक्यावरुन सहज पुढे घेऊन गेलं.

    पुलाचा दगडी कठडा उन्हाने तापला झालेला होता, राजूनं त्याच्यावर हात ठेवला. पण त्याची गरमी राजूला सुखदायक उबदार वाटायला लागली. हा काठ सुटला की पुढं काय? असं काहीसं वाटलं. तो सरळ पुलाच्या कठड्यावर दोन्ही कोपरं आडवी टेकवून, नदीकडे बघत तिथंच थबकला. नदीत खाली नीट बघायला, त्याला जरा चवडे वर करायला लागत होते. नदीच्या निम्या पात्रात पाणी वहात होतं आणि एका बाजूची काळसर पांढरी वाळू दिसायला लागली होती. डावीकडे जिथं पाणी खोल होतं, तिथल्या भागात, वरचं निळं आकाश तुकड्या तुकड्यात चमकत होत.

    शाळेतून घरी परत येताना नदीतून यायला परवानगी नव्हती, तरी पण पुलाच्या रुंद, दगडी मोठया कमानी खालून, नदीकडेच्या उथळ पाण्यात पाय बुचकत चाललं, की घोट्यापर्यंतचे पाय गारेगार होऊन जात. गारव्यातून बाहेर येत राजूनं लांब नजर टाकली. दूर नदीच्या वाकणावर, पाण्यावर झुकलेलं विलायती चिंचेचं झाड होतं, त्याच्या खाली वाकून कपडे धुणाऱ्या बायका दिसत होत्या. त्यांच्या कपड्याच्या साबणाने, नदीतले धुण्याचे उंच दगड पांढुरके होऊन गेले होते. पांढुरक्या साबणाचा वास येणाऱ्या दगडांवर बसून, निवांत पाण्यात हळूच पाय सोडले, की काहीवेळात, खळखळ वाहत्या पाण्यात लहान लहान मासे पायाला लुचत. फक्त आठवणीने सुद्धा राजूच्या पायाला गुदगुल्या झाल्या आणि त्यांने उभ्या उभ्या पाय झटकले.

    राजूच्या गळ्यात उगाच एक आवंढा येऊन गेला आणि इतक्या वेळाने त्याला, तो उन्हात उभा असल्याची जाणीव झाली. पुलाच्या पुढच्या बाजूला, नदीकाठाच्या उंच झाडांनी थंड सावली पसरली होती. तो सावकाश सावलीत सरकून उभा राहिला. सावलीतला दगडी कठडा नेहमी सारखा सुखद गार होता. राजूने उभ्या उभ्याच दगडी कठड्यावर त्याचे गाल टेकवले. नगारखान्या समोरचा लाल गुलाबी पाकळ्या पसणारा गुलमोहर, त्याच्या आतल्या ग्राउंडवरचे क्रिकेट, नदीवरचे पोहणे, रात्रीची गोकुळ अष्ट्मीची देवळातली गरम कॉफी, असं काहीबाही त्याला आठवायला लागलं. मग सरळ डोकं झटकून, तो एका झटक्यात कठड्यावर चढून बसला आणि पहिल्यांदाच त्याला ते चक्क जमलं सुद्धा. आपण पूर्वीपेक्षा जास्तच उंच झालो आहोत, या कल्पनेमुळे त्याला एकदम फिस्स्कन हसूच आलं. आता त्याची ताई समोर असती, तर तिनं नक्की त्याचा गालगुच्चा घेतला असता. नदीकडे पाठ करुन पुलाच्या कठड्यावर बसल्यावर, समोर डोंगरावरची शाळा दिसायला लागली आणि त्याच दुसरं मन एकदम वेड्यासारखं हसायला लागलं.

    राजूला तहान लागल्याची जाणीव पहिल्यांदाच झाली. घशाला सुद्धा कोरड पडली होती, पण तरीही आता त्याला, एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. उन्हातून खेळून घरात आलं, की आज्जी त्याला लगेच पाणी पिऊ देत नसे. अचानक त्याचे आज्जीवरचे प्रेम जागे झाले. रात्री डोळ्यात झोप उतरल्यावर, अंगावर हात टाकायला शेजारी आज्जी नसेल, तर कसली तरी अनामिक भीती वेढून टाकते, याची त्याला आठवण झाली. आज्जीच्या नुसत्या असण्याने, त्याला एकदम आधार सापडला. आता कसं कोणजाणे, थोड्याच वेळापूर्वी, स्वतःला जाणता, सक्षम समजणारा तो, पुन्हा आधी होता तितकाच लहान झाला. त्यानं पुलाच्या कठड्यावरुन रस्त्यावर उडी मारली आणि तो नव्या ओढीने परत निघाला. इतका वेळ मनावर आलेलं मळभ, आता पूर्णपणे निघून गेलं होत.